पालघर जिल्ह्यात वीटभट्टीवर स्थलांतरित लाभार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा यशस्वी कार्यक्रम
दिनांक २१/१२/२०२४
जिल्हा परिषद पालघर
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांच्या आदेशानुसार,दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी पालघर जिल्ह्यात वीटभट्टीवरील स्थलांतरित लाभार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांमध्ये या तपासणीसाठी आरोग्य शिबीरे राबविण्यात आली. यासाठी प्रत्येक ठिकाणी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
रवींद्र शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डहाणू तालुक्यातील जामशेत (कामडीपाडा) येथे भेट दिली. त्यांच्या सोबत प्रवीण भावसार (जिल्हा कार्यक्रम अधिकारी), श्री. अतुल पारस्कर कर (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नरेगा), बाल विकास प्रकल्प अधिकारी, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या भेटीच्या वेळी वीटभट्टीवर स्थलांतरित लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर महिला, स्तनदा माता, व 0-6 वयोगटातील बालकांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली. लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांची समस्यांची माहिती घेण्यात आली. तपासणी व्यवस्थित व प्रभावी पद्धतीने पार पडल्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निरीक्षण केले. यापुढे दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांनी एकत्रितपणे आरोग्य तपासणी शिबीरे राबवावी, असे निर्देश देण्यात आले. आरोग्य तपासणीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले व यासाठी आरोग्य व महिला बालविकास विभागाच्या कार्याचे कौतुक केले.
हा उपक्रम स्थलांतरित लाभार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून जिल्हा प्रशासनाने भविष्यातही अशीच सातत्यपूर्ण सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.